Thursday, March 6, 2008

Marathi Tutari



मराठी भाषा व संस्कृतीबाबत तडजोड नाही, अशी भूमिका मांडताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांनी महाराष्ट्रात शिस्तीत राहावे, असा दम आज भरला. मनसेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी आपण कल्याणमध्ये घेतलेल्या भूमिकेबाबत आजही ठाम असल्याचे सांगितले. ......
महाराष्ट्रात बिहाऱ्यांनी आईवरून शिवी दिली किंवा तसा प्रयत्नही झाला तर रोज कानफाटात मारेन, असा इशारा त्यांनी दिला. मराठी माणसाने दुसऱ्याला दूषणे देण्यापेक्षा स्वत:च्या उत्कर्षासाठी स्वत:च झटले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली.

"मनसे'च्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांच्या मनोरंजनासाठी अशोक हांडे निर्मित "मराठी बाणा' हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. कार्यक्रमाच्या मध्यांतराच्या वेळी राज ठाकरे यांचे आगमन झाले व थोड्‌याच वेळाने सत्कारांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांचे भाषण सुरू झाले. आजच्या दिवशी "मराठी बाणा' हाच कार्यक्रम हवा होता, असे सांगताना फक्‍त त्यासाठीच हा वर्धापनदिन सायंकाळऐवजी सकाळी घेतल्याचे त्यांनी सांगितले. हांडेंचे कार्यक्रम राज्यात खूप ठिकाणी लावणार आहे. मराठी भाषा व संस्कृतीसाठी ही धडपड आहे. कला व साहित्य कसे जगेल हे पाहा, असा सल्ला देताना ते टिकविण्यासाठी पक्षाकडून पावले उचलली जातील, हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. नगरसेवकापासून ते खासदारापर्यंत सर्वच मराठी; पण बकालपणासाठी मराठी भाषकांना कारणीभूत ठरवताना रेशनकार्डापासून ते लायसन्स परप्रांतीयांना कशी सहज उपलब्ध होतात, याबाबत त्यांनी भाषणात खंत व्यक्‍त केली.

""मला महाराष्ट्राला जो नवा चेहरा द्यायचा आहे, तो या नव्या चेहऱ्यांतूनच, असे राज यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या विषयाला त्यांनी आपल्या भाषणात हात घातला. १२२ वर्षे असलेल्या कॉंग्रेसला १० लाख ३१ हजार मते, ४१ वर्षे जुन्या शिवसेनेला ८ लाख ७७ हजार मते व १० महिन्यांपूर्वीच्या मनसेला ४ लाख ५१ हजार मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस तर चौथ्या क्रमांकावर गेली,'' असे सांगत ""माझ्या वाटचालीबाबत ज्यांना चिंता वाटते त्यांनी हे आकडे पाहावेत,'' असा सल्ला त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, ""जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारानिमित्त हरसूल या गावात गेलो होतो. अगदी गुजरातच्या सीमेला लागून हे गाव आहे. तेथपर्यंत मनसेचा झेंडा, नाव पोचले आहे. मनसेला स्थानिक उमेदवार मिळाले; पण कॉंग्रेसला ते बाहेरून आणावे लागले. वर्षभरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेला मनसे हा पहिला पक्ष असून, शिवसेना तरी वर्षभरात इतकी पोचली होती का,'' असा प्रश्‍न त्यांनी केला. पुण्यात पहिल्या वर्षी नंदू घाटे हे एकमेव नगरसेवक, नंतर पुढच्या वेळी काका वडके, त्यानंतर शशिकांत सुतार. मात्र पुण्यात मनसेचे पहिल्याच निवडणुकीत ८ नगरसेवक निवडून आले. नाशिकमध्ये १२ व २४ ठिकाणी मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत, असे सांगून, पुण्यात मनसेचा झालेला शिरकाव महत्त्वाचा असल्याचे राज म्हणाले.

आता निवडणुकाही झाल्या आहेत व मनसेची बांधणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढच्या काळात कार्यकर्त्यांसाठी ठोस कार्यक्रम, आराखडा असेल. भविष्यात रिझल्ट दिसतील व तुमच्याच रूपाने ते दिसतील, असे राज यांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाडात प्रतिसाद दिला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिंकणाऱ्या नेत्यांची मोट बांधून पक्ष काढला. पण मला सामान्य कार्यर्कत्यांंना मोठे करायचे आहे. असेही त्यांनी सांगितले. मनसेच्या वाटचालीबद्दल मनोहर जोशी यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. सरांनी मागे वळून स्वत:चा राजकीय प्रवास बघावा. त्यांनी पक्षासाठी केव्हा स्वत:च्या खिशात हात घातला आहे का ? असा सवाल राजनी केला.
बाबा मला तो...

उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता ते माझ्यावर दुसऱ्यांना टीका करायला लावतात. माझ्यावर थेट टीका करायची हिंमत ते करत नाहीत. स्वत: नामनिराळे रहातात. पण मी जरा फटकारले तर बाबा मला तो... अशी नक्कल त्यांनी केली.

No comments: