Saturday, May 3, 2008

राज ठाकरे पुन्हा कडाडले!


महाराष्ट्रधर्म वाढवा, चिरिमिरीसाठी महाराष्ट्र विकू नका अशी कळकळीची विनंती.... महाराष्ट्राचे "गोमटे' करणे आहे हा निर्धार... आणि उत्तर प्रदेशी- बिहारींच्या "आक्रमणा'वर प्रहार ही त्रिसुत्री मांडणारे तडाखेबंद भाषण करीत राज ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कची सभा गाजविली. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सुमारे दीड तास केलेल्या अत्यंत आक्रमक भाषणात राज ठाकरे यांनी आपल्या जुन्या मुद्यांना नव्याने उजाळा दिला. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणारे लोंढे हे मुंबई व महाराष्ट्रावरील आक्रमणच आहे, असे सांगून ते रोखण्याची आवश्‍यकता त्यांनी प्रतिपादन केली. यासंदर्भात त्यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका पुस्तकातील काही उतारेही वाचून दाखविले. बाबासाहेबांनीही उत्तर प्रदेशच्या आक्रमणाबद्दल भय व्यक्त केले होते, असे त्यांनी सांगितले. अबू आझमी, अमिताभ बच्चन यांच्यावर आपण जी टीका केली होती, त्यात चूक काय होते, असा सवाल करून आपल्याविरोधात हिंदी आणि इंग्रजी वाहिन्यांनी केलेल्या प्रचाराचा समाचार घेतला. यूपी-बिहारींचा मुंबई ताब्यात घेण्याच मनसुबा उधळून लावला म्हणून ते चिडले, असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वशैलीची, देहबोलीची क्षणोक्षणी आठवण करून देणाऱ्या या भाषणात राज ठाकरे यांनी मराठी माणसांच्या गुणदोषांवरही बोट ठेवले. झाले ते झाले, पण येथून पुढे तरी महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा प्रयत्न करा, मराठी चित्रपट, मराठी नाटके पाहण्यासाठी आवर्जून जा, असा संदेश त्यांनी दिला.

No comments: