Tuesday, May 6, 2008

राजवरील कारवाईवरून मंत्रिमंडळात खडाजंगी






Please Give Your Suggestion's In The Box Provided On Website To Improve Us.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेल्या शनिवारी शिवाजी पार्कवर झालेल्या भाषणाचे तीव्र पडसाद आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. राज यांना सुरक्षा व्यवस्था पुरवून विनाकारण त्यांचे महत्त्व वाढवले जात असल्याची टीका करत काही मंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाच टार्गेट केले. ....
त्यामुळे वैतागलेल्या आबांनी, "राज यांच्यावर कारवाई केली तरी चूक ठरवले जाते; नाही केली तरी चूक ठरवले जाते,' अशी उद्विग्नता व्यक्‍त करत थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. अखेर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते.

आज मंत्रिमंडळाचे कामकाज आटोपल्यावर मुख्य सचिव व अन्य सचिवांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. यानंतर इतर राजकीय विषयांवर चर्चा सुरू झाली तेव्हा कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनीही "राज ठाकरे यांना महत्त्व का दिले जात आहे? त्यांच्या मागे-पुढे पोलिसांच्या गाड्या धावत असतात. त्यांना संरक्षण देण्याची काय गरज आहे,' असा सवाल उपस्थित केला; तर "राज ठाकरे, अबू आझमी वाट्टेल ते बोलत असतात. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही,' असे टीकास्त्र गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर मंत्र्यांनी सोडले.

कॉंग्रेसबरोबरच स्वपक्षीय मंत्र्यांकडून घरचा आहेर मिळाल्याने आबा प्रचंड वैतागले. "राज यांच्यावर कारवाई करावी, तर कारवाई करून विनाकारण मोठे कशाला करता, असे बोलले जाते आणि कारवाई केली नाही, तरी चुकीचे ठरवले जाते. राज्यात कायदा व सुव्यवस्था नसेल तर मी राजीनामा देतो,' असे उद्विग्न उद्‌गार आबांनी काढले. वाद इतका टोकाला गेलेला पाहून मुख्यमंत्री देशमुख यांनी हस्तक्षेप केला. सध्या राज यांचा विषय सर्वत्र सुरू असल्याने मंत्री बोलत आहेत, तुम्ही वैयक्‍तिक घेऊ नका, असा दिलासा आबांना देत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर राज यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा फेरविचार करण्यात येईल, असे आबांनी सांगितले. राज व अबू आझमी यांच्या भाषणांच्या, विधानांच्या बाबतीत कायदेशीर बाजू तपासण्यात येत आहे, असेही आबांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी ३ मे रोजी जाहीर सभेत केलेले भाषण पूर्ण तयारीचे होते. मुंबईत कोणीही येऊन राहू शकते, हा प्रत्येक नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे, असा युक्तिवाद करणाऱ्यांना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच लिहिलेल्या "भाषावार प्रांतरचना' या पुस्तकातील उताऱ्यांचा हवाला देऊन त्यांनी मुंबईवर अधिकार मराठी माणसाचाच, या आपल्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. आता "हे मी म्हणत नाही, बाबासाहेब म्हणतात,' असे सांगणाऱ्या राजवर कशी कारवाई करणार, असा सवाल एका ज्येष्ठ मंत्र्याने केला.
------------------------------------------------------------
आबांचा इन्कार
मंत्रिमंडळातील खडाजंगीबाबत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. राज यांच्यावरील कारवाईवरून मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला नसल्याचेही ते म्हणाले. आपण राजीनाम्याची धमकी दिल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला.
------------------------------------------------------------

No comments: